
कपिल पाटील फाउंडेशनची दिवाळी पहाट संस्मरणीय
कपिल पाटील फाउंडेशनची दिवाळी पहाट संस्मरणीय
कल्याणमध्ये भूमी त्रिवेदी, अभिजीत सावंत, प्राजक्ता शुक्रेच्या गीतींची सूरमयी मैफल
कल्याण, दि. २ (प्रतिनिधी) : कपिल पाटील फाउंडेशनतर्फे कल्याणमध्ये दहा वर्षांपासून दिवाळी पाडव्याच्या दिवशी आयोजित करण्यात येणारी `दिवाळी पहाट' यंदाही स्मरणीय ठरली. मांगल्याचे प्रतीक दीपावली उत्सवानिमित्ताने एकमेकांना शुभेच्छा देत हजारो कल्याणकरांनी उपस्थित राहून सूरमयी संगीताची मेजवानी अनुभवली.
प्रख्यात गायिका भूमि त्रिवेदी यांची प्रभू श्रीराम, भगवान शिवशंकरावरील गीते व जुगलबंदी, `इंडियन आयडॉल'फेम गायक अभिजीत सावंत यांची थिरकवायला लावणारी हळुवार गीते, मनाला स्पर्श करणारी गायिका प्राजक्ता शुक्रेचे बोल, गायिका जुईली जोगळेकरची जोशपूर्ण आवाजातील नजाकत आणि बंजारा डान्स ग्रूपमधील कलाकारांचे बहारदार नृत्याने रसिकांना चार तास खिळवून ठेवले. नम्रता संभेराव व प्रसाद खांडेकर यांची विनोदाची तुफान कॉमेडी लक्षवेधी ठरली. मृण्मयी देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.
या कार्यक्रमातून कल्याणमधील हजारो नागरिकांबरोबर संवाद साधला. माझ्या कारकिर्दीत कल्याणवासियांचा सिंहाचा वाटा आहे. दहा वर्षांपासून दिवाळी पहाटच्या निमित्ताने कल्याणकरांबरोबर दिवाळीचा आनंद घेता येतो. यापुढील काळातही दिवाळीत संगीतरुपी गोडवा कायम राहील, अशी ग्वाही माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी नागरिकांना दिली.
या कार्यक्रमाला शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर, माजी आमदार नरेंद्र पवार, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस प्रेमनाथ म्हात्रे, शहराध्यक्ष वरुण पाटील, माजी नगरसेवक अर्जुन भोईर, अर्जुन म्हात्रे, प्रशांत पाटील, सुमित पाटील आदींसह मान्यवर उपस्थित होते.