
पाच दिवसांनंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांची भेट
पाच दिवसांनंतर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांची भेट
मुंबई:- काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याकरिता भाजप नेते आणि भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा निवासस्थानी पोहोचले. एकनाथ शिंदे गेल्या चार-पाच दिवसांपासून आजारी आहेत. मूळगावी दरे येथे आराम केल्यानंतर, ठाण्यात येऊन त्यांनी उपचार घेतले. परंतु तरीही अस्वस्थ वाटत असल्याने त्यांनी ज्युपिटर रुग्णालयात जाऊन वैद्यकीय चाचण्या करवून घेतल्या. शिंदे रुग्णालयातून थेट वर्षा बंगल्यावर आले. दुपारी त्यांनी महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी विशेष बैठक घेतली. त्यानंतर आता फडणवीस वर्षावर एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याकरिता पोहोचले. उभय नेत्यांमध्ये पाच दिवसांनंतर पहिल्यांदाच भेट होत आहे. राज्यात महायुतीला बहुमत मिळूनही आठवडा उलटून गेला तरी सत्तास्थापनेच्या हालचाली होत नव्हत्या. एकनाथ शिंदे यांनी सुरुवातीला मुख्यमंत्रिपद मिळावे, यासाठी दबावतंत्राचा वापर केला. परंतु यंदा मित्रपक्षाकडे मुख्यमंत्रिपद देणार नसल्याचे भाजप पक्षश्रेष्ठींनी स्पष्ट सांगितल्यानंतर शिंदे यांनी गृह आणि नगरविकास खात्यासाठी आग्रह धरला. यातूनच दोन्ही पक्षांमध्ये काहीसे तणावाचे संबंध निर्माण झाले. आजारी असल्याचे सांगून दिल्लीतील बैठकीनंतर एकनाथ शिंदे थेट गावी गेल्याने सत्तावाटपाच्या बैठकाही खोळंबल्या. गेली तीन दिवस भाजप-सेना-राष्ट्रवादीत सत्तावाटपाची एकही बैठक होऊ शकलेली नाही. त्यामुळे फडणवीस-शिंदे यांच्या आजच्या भेटीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.