
वाल्मिक कराडला धक्का, 14 दिवसांची पोलीस कोठडी
वाल्मिक कराडला धक्का, 14 दिवसांची पोलीस कोठडी
बीड :- जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणातील मास्टरमाईंड असलेला वाल्मिक कराड हा गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता. पोलिसांना त्याचा अनेक दिवसांपासून शोध होता. मात्र,काल 31 डिसेंबररोजी वाल्मिक कराड हा स्वत:हून पुण्याच्या सीआयडी कार्यालयात सरेंडर झाला. यानंतर नियमानुसार कराड याचं मेडिकल करण्यात आलं. त्यानंतर त्याला बीडच्या केज कोर्टात हजर करण्यात आलं.
यावेळी आरोपी वाल्मिक कराडबाबत सुनावणी झाली. रात्री उशिरा ही सुनावणी पार पडली. यावेळी सरकारी वकील जे. बी. शिंदे यांनी वाल्मिक कराडला 15 दिवसांची पोलीस कोठडी देण्याचा जोरदार युक्तिवाद केला. तर, कराडचे वकील अशोक कवडे यांनी जामीन मिळवण्यासाठी युक्तिवाद केला.
अखेर दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाने वाल्मिक कराडला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पवनऊर्जा क्षेत्रातील अवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या प्रकल्प अधिकाऱ्याकडे 2 कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी वाल्मिक कराडवर खंडणीचे आरोप होते. याच प्रकरणी त्याला केज कोर्टात हजर करण्यात आले होते.