
साहित्यिकांनी मानवता जपली पाहिजे - ज्येष्ठ साहित्यिक राजीव जोशी
साहित्यिकांनी मानवता जपली पाहिजे - ज्येष्ठ साहित्यिक राजीव जोशी
साहित्यिकांनी मानवता जपली पाहिजे - ज्येष्ठ साहित्यिक राजीव जोशी
कल्याण : प्रत्येक माणसाचं जीवन ही लिखाणाची प्रेरणा आहे. काचेच्या घरात राहून साहित्यिक होता येत नाही. कवींनी समकालाचा वेध घ्यावा. साहित्यिकांनी मानवता जपून मौलिक लेखन करणं गरजेचं आहे असे मोलाचे मार्गदर्शन ज्येष्ठ कवी राजीव जोशी यांनी सार्वजनिक वाचनालय कल्याण, कल्याण डोंबिवली महानगर पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने पु.भा. भावे व्याख्यानमाले अंतर्गत “वाचन संकल्प महाराष्ट्राच्या” या उपक्रमातील साहित्यिक मेळाव्यात उपस्थित साहित्यिकांना केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन ज्येष्ठ साहित्यिक जनार्दन ओक उपस्थित होते.
मराठी साहित्यात कल्याण शहरातील साहित्यिकांचे मोलाचं योगदान आहे. अशा कर्मभूमी व जन्मभूमी असणाऱ्या चिंतामणराव वैद्य, वि.आ.बुआ,अंबादास अग्निहोत्री, भालचंद्र रेढे, माधवी गोगटे, दि. बा.मोकाशी, कविवर्य माधवानुज, श्रीराम साठे, कृष्णराव धुळप, रामभाऊ कापसे, माधव आचवल, गोपाळराव टिकेकर, मधु सोमठणकर अशा अनेक कल्याण येथील ज्येष्ठ व श्रेष्ठ साहित्यिकांचा मागोवा वाचनालयाचे विश्वस्त अॅड.सुरेश पटवर्धन यांनी घेतला.
आपणच आपली ओळख विसरत चाललो आहोत. याकरीता कल्याणातील दिवंगत साहित्यिकांचे आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात डॉक्युमेंटेशन होण आवश्यक आहे असे मत चिटणीस माधव डोळे यांनी मांडले. वाढत्या सोशल मिडीयाच्या वापरामुळे अगदी जवळचे साहित्यिकही व्हॉट्सअॅप व फेसबुकच्या माध्यमातून एकमेकांना ओळखतात म्हणूनच सर्व साहित्यिकांनी एकत्र जमून आपले साहित्यिक योगदान वाढविण्याकरिता वाचनालयाच्या माध्यमातून प्रथमच या आगळा वेगळ्या साहित्यिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे असे मत सरचिटणीस भिकू बारस्कर यांनी मांडले.
याप्रसंगी कल्याण शहरातील मान्यवर साहित्यिकांचे साहित्य संपदेचे प्रदर्शन लावण्यात आले होते. कल्याण शहरातील व परिसरातील अनेक ज्येष्ठ व श्रेष्ठ साहित्यिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.