Breaking News

कल्याण पडघा मार्गावर नविन पुल बांधा - माजी आमदार नरेंद्र पवार

कल्याण पडघा मार्गावर नविन पुल बांधा - माजी आमदार नरेंद्र पवार

कल्याण पडघा मार्गावर नविन पुल बांधा - माजी आमदार नरेंद्र पवार 

कल्याण : कल्याण - पडघा मार्गावरील गांधारी नदीवर अस्तित्वात असलेल्या पुलाला समांतर नविन उड्डाणपुल बांधण्याची मागणी माजी आमदार नरेंद्र पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. या मागणीसंदर्भात पवार यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेत आपल्या मागणीचे निवेदन सादर केले. 

कल्याण शहरातून पडघामार्गे नाशिकला जाण्यासाठी सध्या गांधारी नदीवरील उड्डाणपूल हा एकमेव पर्याय आहे. मात्र हा उड्डाणपुल बांधून जवळपास 30 वर्षांहून अधिक काळ झाला आहे. सद्यस्थिती पाहता हा पूल अतिशय अरुंद असून या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांची संख्या गेल्या तीन दशकांत प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्यासोबतच राज्याच्या दृष्टीने गेमचेंजर प्रकल्प असणाऱ्या मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गाला जोडणारा इंटरचेंजही याच मार्गावरील आमणे गावात बांधण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण पडघा मार्गावरील वाहतूकीत येत्या काळात आणखी मोठी भर पडणार असून अस्तित्वात असलेला गांधारी उड्डाणपूल त्यासाठी निश्चितच अपुरा पडेल अशी वस्तुस्थिती माजी आमदार नरेंद्र पवार यांनी आपल्या निवेदनाव्दारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडली आहे. 

त्याशिवाय काही वर्षांपूर्वी आलेल्या महापुराच्या पाण्यामुळे या गांधारी पुलाला तडेही गेले होते. हा उड्डाणपूल केवळ कल्याण -पडघामार्गे नाशिक, आग्र्याला जाणारा दुवाच नाहीये, तर या मार्गावर बापगाव, सोनाळे, सावद, लोणार या गावांतील हजारो रहिवाशांना कल्याणला जोडणारा महत्त्वाचा धागाही आहे. तसेच गेल्या काही वर्षांमध्ये या भागात मोठ्या संख्येने गोडाऊनही झाली असून त्यामध्ये काम करणारे हजारो कर्मचारीही दररोज याच मार्गावरून ये जा करत असतात.

त्यातच समृद्धी महामार्गाचा इंटरचेंज सुरू झाल्यानंतर या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांची वाढीव संख्या आणि अस्तित्वात असलेल्या वाहनांची संख्या ही या उड्डाणपुलाच्या क्षमतेबाहेर जातील. याचा विचार करता याठिकाणी तातडीने 6 किंवा 8 पदरी प्रशस्त असा नविन समांतर उड्डाणपूल बांधण्याची गरज असून या नविन समांतर पुलाला मंजुरी देऊन संबंधित विभागाला त्याचे आदेश देण्याची आग्रही मागणी माजी आमदार नरेंद्र पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.


Most Popular News of this Week