मीटर रिकॅलीब्रेशन बाबत रिक्षा चालकांचा आरटीओला उपोषणाचा इशारा
कल्याण : मीटर रिकॅलीब्रेशन बाबत रिक्षा चालकांनी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल तसेच एआरटीओ विनोद साळवी यांना त्यांच्या दालनात समक्ष भेटून संघर्ष सेना ऑटो रिक्षा व भाजपा वाहतूक संघटना यांच्यावतीने संघर्ष सेना ऑटो रिक्षा युनियनचे ठाणे जिल्हा अध्यक्ष महेंद्र मिश्रा व भाजपा वाहतूक संघटनेचे अध्यक्ष विल्सन काळपुंड यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले.
कल्याण आरटीओ झोन मध्ये 50 ते 60 हजार रिक्षा असून 700 ते 800 टॅक्सी आहेत व मीटर दुरुस्ती करणारे दहा ते पंधरा असून मीटर टेस्टिंग सेंटर फक्त एकच आहे. तसेच परिवहन विभागात मनुष्यबळही कमी आहे. असे असल्याकारणाने परिवहन विभागाने दिलेल्या दिनांक 30 एप्रिल 2025 पर्यंत ऑटोरिक्षा – टॅक्सीच्या इलेक्ट्रॉनिक मीटरचे रिकॅलीब्रेशन करणे शक्य नाही.
त्यामुळे रिक्षा टॅक्सी चालक यांनी ठाणे तसेच नवी मुंबई येथील टेस्टिंग सेंटर मधून मीटर रिकॅलीब्रेशन करून आणले तर ते कल्याण परिवहन विभागाने मान्य करावे व कल्याण आरटीओ झोन मध्ये अजून एक टेस्टिंग सेंटरला मान्यता देऊन लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावे आणि मीटर रिकॅलीब्रेशन करण्यासाठी 30 जून 2025 पर्यंत मुदतवाढ द्यावी अशी मागणी रिक्षा चालकांनी केली आहे.
मागील वेळी मीटर रिकॅलीब्रेशन करतेवेळी रिक्षा टॅक्सी चालकांना नाहक त्रासाला व दंडाला सामोरे जावा लागले होते. यावेळी ती परिस्थिती येऊ नये म्हणून परिस्थिती निर्माण होण्या अगोदरच निदर्शनात आणून दिली आहे. जर पुन्हा रिक्षा आणि टॅक्सी चालकांना निदर्शनात आणून दिलेल्या कारणांमुळे दंडाला सामोरे जावे लागले तर संघटनेच्या वतीने 1 मे 2025 पासून दंड माफ होत नाही तोपर्यंत उपोषण करण्याचा इशारा रिक्षा चालकांनी दिला आहे.