मुंबई पोलिस - “ड्रग फ्री मुंबई”
दोन दिवसीय अंमली पदार्थविरोधी विशेष मोहिमेत ७२ गुन्हे दाखल, २१ फरार व पाहिजे आरोपींना अटक, अजामीनपात्र वॉरंट बजावून ४० आरोपींना अटक, रु. १५.८७ कोटीचा मुद्देमाल जप्त
मुंबईत ३० जुलै २०२६ पासून सुरू करण्यात आलेल्या “ड्रग फ्री मुंबई” अभियानांतर्गत, तसेच केंद्र शासनाच्या २ ऑगस्ट २०२६ रोजी सुरू झालेल्या “नशामुक्त भारत अभियान” यांच्या उद्दिष्टांच्या अनुषंगाने, मुंबई पोलिसांनी १४ व १५ ऑक्टोबर २०२६ रोजी संपूर्ण मुंबई शहरात अंमली पदार्थविरोधी विशेष मोहीम राबविण्यात आली. कायद्याची कठोर अंमलबजावणी, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि जनजागृती या त्रिसूत्रीवर आधारित अभियानाचा भाग असलेल्या या विशेष मोहिमेत एनडीपीएस कायद्याअंतर्गत अंमली पदार्थ बाळगणे/विक्री करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करणे, पूर्व दाखल गुन्ह्यांतील फरार व पाहिजे आरोपींना अटक करणे आणि आरोपीतांविरुद्ध प्राप्त अजामीनपात्र वॉरंटची बजावणी करणे, या तीन प्रमुख बाबींवर विशेष लक्ष्य केंद्रित करण्यात आले.
पोलीस ठाणे, अंमली पदार्थविरोधी विशेष कक्ष आणि गुन्हे शाखेच्या इतर कक्ष कार्यालयांनी समन्वयाने केलेल्या कारवाईत ७२ गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. त्याव्यतिरिक्त २१ फरार व पाहिजे आरोपींना देखील अटक करण्यात आलेली आहे. तसेच न्यायालयाकडून प्राप्त अजामीनपात्र वॉरंटची बजावणी करून एकूण ४० आरोपींना या मोहिमेदरम्यान अटक करण्यात आलेली आहे. सदरच्या विशेष मोहिमेदरम्यान गांजा, मेफेड्रोन (एमडी), हेरॉईन / ब्राऊन शुगर, चरस, एलएसडी पेपर, कोकेन, हशिश आणि हायड्रोपोनिक गांजा असे एकूण ४६.१६ किलो अंमली पदार्थ व कोडीनमिश्रित कफ सिरपच्या एकूण ९,५४० बाटल्या असा एकूण अंदाजे रु. १५.८७ कोटी किमतीचा मुद्देमाल व रु. ९.४७ लाख रोख रक्कम जप्त करण्यात आलेली आहे.
विशेष मोहिमेदरम्यान पूर्वी अंमली पदार्थविरोधी दाखल गुन्ह्यांतील आरोपी हा त्याच्या इतर ०४ साथीदारांसह संघटित टोळी बनवून अंमली पदार्थांचा व्यवसाय करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने सदर आरोपीतांविरुद्ध गुन्हे शाखेकडून सदर गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (MCOCA) कारवाई केली. तसेच प्रतिबंधात्मक कारवाईचा भाग म्हणून एनडीपीएस गुन्ह्यांतील एका सराईत आरोपीस PIT-NDPS कायद्यांतर्गत एक वर्षासाठी नाशिक कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले. सन २०२६ मध्ये आतापर्यंत एकूण १४ जणांविरुद्ध PIT-NDPS कायद्यांतर्गत कारवाई करून स्थानबद्ध करण्यात आलेले आहे.
विशेष मोहिमेदरम्यान एनडीपीएस गुन्ह्यांतील आरोपींची २० अनधिकृत घरे व १५४ अवैध पानटपऱ्या निष्कासित करण्यात आल्या. अंमलबजावणी व प्रतिबंधात्मक कारवाईसोबतच अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी जनजागृतीवरही भर देण्यात येत आहे. शाळा, महाविद्यालये, गणेशोत्सव-नवरात्रोत्सव आणि सार्वजनिक ठिकाणी आयोजित गरबा कार्यक्रमांसह ९,०३९ ठिकाणी राबविण्यात आलेल्या जनजागृती उपक्रमांत १,८३,९२८ नागरिक सहभागी झाले आहेत.
अंमली पदार्थविरोधात सातत्यपूर्ण कारवाई, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि लोकसहभागाच्या माध्यमातून “ड्रग फ्री मुंबई” हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मुंबई पोलीस कटिबद्ध असून अंमली पदार्थांशी संबंधित कोणतीही माहिती राष्ट्रीय अंमली पदार्थ हेल्पलाईन (MANAS) - १९३३ द्वारे पोलिसांना देऊन या अभियानात सहकार्य/सहभागी होण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे.
Most Popular News of this Week
कुरार पोलीस ठाणे, मुंबई
कुरार पोलीस ठाणे, मुंबईदिनांक - १४/१०/२०२६मोटार स्कूटर चोरी करणाऱ्या चोरास...
अंमली पदार्थ विरोधी कक्ष,...
पोलीस उप आयुक्त, अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, गु.अ.वि., मुंबई ...
पार्कसाईट पोलीस ठाणे – खुनाचा...
पार्कसाईट पोलीस ठाणे – खुनाचा प्रयत्न दि. १७/१०/२०२६ रोजी २३:३० वा....
पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण),...
पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण), गुन्हे शाखा, बृहन्मुंबई यांचे...
मुंबई पोलिस - “ड्रग फ्री...
दोन दिवसीय अंमली पदार्थविरोधी विशेष मोहिमेत ७२ गुन्हे दाखल, २१ फरार व...
