क्राईम ब्रांच
पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण), गुन्हे शाखा, बृहन्मुंबई यांचे कार्यालय
प्रसिद्ध अभिनेत्यावरील गोळीबार प्रकरणात आणखी ५ आरोपींना अटक.
दिनांक १८ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी जुहू परिसरात एका प्रसिद्ध सिने अभिनेत्याच्या कारच्या दिशेने दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. सदरबाबत जुहू पोलीस ठाणे येथे गु.र.क्र. १७९०/२०२६, कलम १०९(१), ३(५) भारतीय न्याय संहिता सह कलम ३, २५ शस्त्र अधिनियम १९५९ अन्वये गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास गुन्हे शाखा गु.र.क्र. १४३/२०२६ अन्वये करण्यात येत आहे. या गुन्ह्यात यापूर्वी गुन्हे शाखेने कोटा, राजस्थान येथून तीन आरोपींना ताब्यात घेतले होते. सदर तीनही आरोपी दि. ३१/१०/२०२६ पर्यंत पोलीस कोठडीत आहेत.
गुन्ह्याच्या पुढील तपासादरम्यान गुन्हे शाखेच्या पथकांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपींना शस्त्र पुरवठा व मदत करणाऱ्या टोळीबाबत अचूक माहिती प्राप्त केली. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने दिल्ली पोलिसांच्या मदतीने दिल्ली येथून चार आरोपींना (दोन पुरुष व दोन महिला) अटक केली. तसेच हरियाणा पोलिसांच्या मदतीने सोनीपत, हरियाणा येथून आणखी एका आरोपीला अटक केली.
तपासात असे निष्पन्न झाले आहे की, अटक आरोपींपैकी दोन आरोपींनी अमृतसर, पंजाब येथे जाऊन शस्त्र प्राप्त केले. सदरचे शस्त्र दोन महिला आरोपींनी रेल्वेने मुंबई येथे आणून टोळीतील हल्लेखोरांकडे सुपूर्द केले होते. तसेच अटक आरोपींपैकी एक आरोपी हल्लेखोरांसोबत मुंबईत राहून त्यांना मदत करत होता.
अशा प्रकारे या कारवाईत ३ पुरुष व २ महिला अशा एकूण ५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्यात आतापर्यंत एकूण ८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक आरोपी हे हरियाणा व उत्तर प्रदेश राज्यातील रहिवासी आहेत. गुन्ह्याचा पुढील तपास खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, मुंबई हे करीत आहेत.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई श्री. देवेन भारती, मा. पोलीस सह आयुक्त (गुन्हे) श्री. अनिल कुंभारे, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. कृष्ण कान्त उपाध्याय, मा. पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण) श्री. राज तिलक रौशन, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, डी (विशेष) श्री. सदानंद राणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेतील अधिकारी व अंमलदारांनी पार पाडली आहे.
Most Popular News of this Week
गुन्हे शाखा, युनिट ९, वांद्रे...
दीड किलो चरस जप्त; बाळगणाऱ्या एका आरोपीस गुन्हे शाखा, मुंबईकडून अटक ...
